“५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले!”-भुदरगड पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात

<p>“५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले!”-भुदरगड पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात</p>

कोल्हापूर : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या भुदरगड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलसह एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुभाष आनंदा चौगले (वय ३९), पोलीस हेड कॉन्स्टेबल, भुदरगड पोलीस ठाणे आणि मुस्तफा दस्तगीर शेख (वय ४१, रा. साई कॉलनी, गारगोटी) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदाराविरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास चौगले यांच्याकडे होता. तपासात मदत करणे, चार्जशीट व्यवस्थित पाठवणे तसेच जप्त केलेली कार सोडून देण्यासाठी चौगले यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम खाजगी इसम मुस्तफा शेख यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुस्तफा शेख यांना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर चौगले यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, स.पो.उप निरीक्षक प्रकाश भंडारे, पो. हे. कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. संदिप काशीद, पो. ना. सचिन पाटील, पो. कॉ. उदय पाटील, चा.स.पो. फौ. गजानन कुराडे अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली.