कोल्हापूरात अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई; तळघरातील बाथरूम व टॉयलेट्स बांधकाम हटवले
कोल्हापूर : शहरातील सी वॉर्ड, बिंदू चौक परिसरातील सि.स. नं. 525 येथील एम.के. टॉवर अपार्टमेंटमध्ये करण्यात आलेल्या विनापरवाना बांधकामावर महानगरपालिकेने मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत तळघरातील बाथरूम व टॉयलेट्सचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले असून उर्वरित कारवाई पुढील टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
याप्रकरणी अलका यशवंत माने यांनी दिलीप आनंदराव मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच मंजूर नकाश्याव्यतिरिक्त करण्यात आलेले बांधकाम 30 दिवसांत काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र संबंधितांनी आदेशाचे पालन न केल्याने महानगरपालिकेने पुढील कारवाईचा निर्णय घेतला.
दरम्यान, पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने कारवाई काही काळ प्रलंबित राहिली होती. याबाबत अलका माने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या सूचनेनुसार आठ आठवड्यांच्या आत कारवाई करण्याचे महानगरपालिकेने मान्य केले होते. त्या अनुषंगाने अखेर पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले व उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंते, कर्मचारी व पोलीस दलाचा सहभाग होता.