कोल्हापूर शहरातील विकास कामांना गती द्या : पालकमंत्र्यांचे महापालिका प्रशासनाला निर्देंश
कोल्हापूर - शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसह तब्बल 28 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राधान्यक्रम ठरवून दर्जेदार सुविधा द्याव्यात आणि कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
या बैठकीत ‘अमृत एक आणि अमृत दोन’ या योजनांचा आढावा घेण्यात आला. थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी दूर करून ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयटी पार्क हायटेक करणे, शाहू मिल, जयप्रभा स्टुडिओ संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. मान्सूनपूर्व नालेसफाई आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्ता आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिर अंडरग्राउंड पार्किंग या प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली. कंत्राटी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याबाबतही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड, रखडलेल्या नियुक्त्या आणि अनुकंपा तत्वावरील भरतीबाबतही निर्देश देण्यात आले. दरम्यान, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी कामांचे विकेंद्रीकरण करून प्राधान्यक्रमानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. वाहतूक, अतिक्रमण आणि ओपन स्पेस बाबतही नियोजनबद्ध कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.