योग ही एक व्यापक प्रणाली : कुलगुरू डॉ. राजनीश कामत
कोल्हापूर - योग ही एक व्यापक प्रणाली असून व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी फायदेशीर आहे. योगाचा आपल्या जीवनात दररोज समावेश केल्यास आपण असंख्य फायदे अनुभवू शकतो, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले. ते आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित 'निरोगी वृध्दत्वासाठी योग' या योग शिबिरात बोलत होते.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे हा उपक्रम देशभरात साजरा करण्यात आला. या उपक्रमात शिवाजी विद्यापीठ सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये सकाळी सव्वा सहा ते सव्वा आठ या कालावधीत योगसाधना शिबीर झाले. यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्यावतीने आणि प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थितीत रोपाला पाणी घालून शिबिराची सुरुवात करण्यात आली.
या शिबिरात साडे पाचशेहून अधिकांनी सहभागी होत. या शिबिराचा लाभ घेतला. योगशिक्षक सूरज पाटील यांनी उपस्थितांना योगसाधनेचे प्रशिक्षण दिले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथून ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण देशाला संबोधित केले.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी, योग साधना अबाल, वृध्द सर्वांसाठीच लाभदायक असल्याचे सांगितले. योगाचा आपल्या जीवनात दररोज समावेश केल्यास आपण असंख्य फायदे अनुभवू शकतो, असे डॉ. राजनीश कामत यांनी सांगितले.