सातबारा नोंदणीसाठी 60 हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
कोल्हापूर : सातबारावर नाव नोंद करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी ( 18 मे) कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी लोकसेवक अमितकुमार जगन्नाथ पाडळकर (वव 44), मंडळ अधिकारी, नृसिंहवाडी तथा अतिरिक्त कार्यभार नांदणी, ता. शिरोळ, यांच्यासह खासगी व्यक्ती शिवाजी आनंदराव जाधव (वय 61, रा. जाधव मळा, धरणगुत्ती, ता. शिरोळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दिली होती. कोर्टाच्या हुकूमनाम्यानुसार सातबारावर नाव नोंद करण्यासाठी आरोपींकडून तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार 18 मे रोजी पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत आरोपींनी 1 लाख 25 हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करून 60 हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. आरोपी मंडळ अधिकारी अमितकुमार पाडळकर यांनी तक्रारदारास 60 हजार रुपये हे शिवाजी जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताच पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अधिक तपास तपास पोलीस उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी पाटील करीत आहेत.