“हद्दवाढीवर चर्चा करा, नाहीतर स्थगन प्रस्ताव”; काँग्रेसचा महापालिकेबाहेर इशारा

<p>“हद्दवाढीवर चर्चा करा, नाहीतर स्थगन प्रस्ताव”; काँग्रेसचा महापालिकेबाहेर इशारा</p>

कोल्हापूर - महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा पार पडणार असून, त्याआधीच शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विरोधी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेच्या आवारात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ तातडीने करण्याची मागणी केली.

महायुती सरकारकडून हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे सांगितले जात असले, तरी ४२ गावांच्या समावेशाचा प्रस्ताव अजूनही नगरविकास खात्याकडे प्रलंबित असल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. या ४२ गावांना विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला असून, त्यामुळे प्रत्यक्षात हद्दवाढ होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

विशेष म्हणजे, २०१७ मध्येच हे प्राधिकरण स्थापन झाले होते. आता पुन्हा त्याच गावांना विशेष दर्जा देण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढीवर निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. “या गावांना विशेष दर्जा दिल्यानंतर प्रत्यक्षात हद्दवाढ होणार नाही, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही,” असा टोला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी लगावला. शहराची हद्दवाढ करून नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक असल्याची मागणीही त्यांनी केली.

कोल्हापूर शहराची लोकसंख्या दहा लाखांच्या मर्यादेपर्यंत वाढवून त्यानुसार विकास आराखडा तयार करावा, असे मत विरोधकांनी मांडले. तसेच, “मुद्दामहून हद्दवाढ प्रलंबित ठेवून कोल्हापूरला आरसीसी झोपडपट्ट्यांचे शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू असून शाहूनगरीच्या प्रतिमेला कलंक लावला जात आहे,” अशी टीकाही करण्यात आली.

आजच्या महासभेत कोल्हापूरच्या हद्दवाढीवर चर्चा घ्यावी, अन्यथा स्थगन प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा राजेश लाटकर यांनी दिल्याने आजच्या सभेत या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.