'या' मागणीसाठी बहुजन परिवर्तन पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
कोल्हापूर - शहरातील यशवंत गृहनिर्माण संस्थेला सन २०१५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सायबर चौक परिसरातील १५ गुंठे जागा ४० सभासदांकरिता सातबारा पत्रकी नोंद करून दिली होती. मात्र प्रत्यक्षात जागेवर जाऊन मोजणी केल्यानंतर ही जागा केवळ सात गुंठे भरत असल्याचे निदर्शनाला आले होते. शिवाय या जागेतून महापालिकेची मोठी ड्रेनेज लाईन गेली असल्याने ही जागा रहिवासास योग्य नसल्याचे निदर्शनाला आले आहे. त्यानंतर गृहनिर्माण संस्थेने वेळोवेळी पाठपुरावा करून फुलेवाडी, हॉकी स्टेडियम किंवा कसबा बावडा येथील १८ गुंठे जागा यशवंत गृहनिर्माण संस्थेला मिळावी, अशी मागणी केली होती. यशवंत गृहनिर्माण संस्थेकडून सन २०१२ पासून आज तागायत फुलेवाडी गट नंबर १४८० ही जागा संस्थेला मिळावी. यासाठी वेळोवेळी सर्व कागदोपत्री पूर्तता करण्यात आलीय. मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे ही जागा यशवंत गृह निर्माण संस्थेला मिळालेली नाही. त्यामुळे संस्थेच्या ४० सभासदांच्या निवाऱ्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. संस्थेच्या सभासदांना फुलेवाडीतील जागा तात्काळ मिळावी, यासाठी आजपासून बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणात बहुजन परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक, यांच्यासह दादा जगताप, चंद्रलेखा वेल्हाळ आणि संस्थेचे सभासद सहभागी झाले होते.