महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल, २४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या: कोल्हापूर परिक्षेत्रात नवे नेतृत्व

 

<h2>महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल, २४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या:<strong> कोल्हापूर परिक्षेत्रात नवे नेतृत्व</strong></h2>

<h2> </h2>

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती जाहीर केल्या असून या फेरबदलात कोल्हापूर परिक्षेत्रालाही नवे नेतृत्व मिळाले आहे. पुणे पोलीस सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेले रंजन शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान आयजी सुनिल फुलारी यांची बदली गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) येथे करण्यात आली आहे.

गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील एकूण २४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या व पदोन्नती करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन) पदावरून अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) पदावर नियुक्ती झाली आहे. दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली असून, लखमी गौतम यांना राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक करण्यात आले आहे. मनोज शर्मा यांची मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुनील हक यांची मुंबई पोलीस सहआयुक्त (प्रशासन) पदावर बदली झाली असून, महेश पाटील यांना पदोन्नती देत विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) करण्यात आले आहे. परमजीत दहिया यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.

सी. के. मीना यांची कोकण परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली असून, संजय दराडे यांची पुणे पोलीस सहआयुक्तपदी बदली झाली आहे. रंजन शर्मा यांच्याकडे कोल्हापूर परिक्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुनिल फुलारी यांची सीआयडी (पूर्व) येथे बदली झाली आहे.

राजेश प्रधान यांची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून, विशीथ मिश्रा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जय कुमार यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

संजय येडपुरे यांची व्हीआयपी सुरक्षा विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. संजय जाधव यांना ठाणे येथे ‘इन सिचू प्रमोशन’ देण्यात आले आहे. दीपक साकोरे यांची नवी मुंबई पोलीस सहआयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.

पंजाबराव उगले यांची पोलीस गृहनिर्माण महामंडळात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून, एस. व्ही. पाठक यांची पुणे येथील आर्थिक गुन्हे विभागात बदली करण्यात आली आहे. विनायक देशमुख यांची नियंत्रक, वैधमापन पदावर नियुक्ती झाली आहे.

ज्योती प्रिया सिंह यांना अंमली पदार्थ विरोधी पथकात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. अनिल कुंभारे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, सत्य नारायण चौधरी यांच्याकडे मुंबई वाहतूक विभागाच्या पोलीस सहआयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या या व्यापक फेरबदलामुळे पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांसह कार्यपद्धतीत बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः कोल्हापूर परिक्षेत्रात नव्या नेतृत्वामुळे कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.