मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; ३० मेपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत ३० मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारकडून ठोस अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आता शांत पण निर्णायक लढा उभारला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
कुणबी प्रमाणपत्राची प्रमुख मागणी -
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ द्यावा, ही आंदोलनाची मुख्य मागणी असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने यासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्याने समाजात असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपसमिती बरखास्त करण्याची मागणी -
मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली उपसमिती प्रभावीपणे काम करत नसल्याचा आरोप करत त्यांनी सद्याची समिती बरखास्त करून नवीन समिती स्थापन करण्याची मागणी केली. “समितीकडून कोणतेही ठोस काम होत नाही. त्यामुळे समाजाचा विश्वास उरलेला नाही,” असे ते म्हणाले.
सरकारच्या नव्या धोरणालाही विरोध -
खुल्या प्रवर्गातील जागा आरक्षित प्रवर्गाला देण्यासंदर्भात राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या धोरणावरही जरांगे यांनी आक्षेप घेतला. या निर्णयामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
शांततेत आंदोलनाचा निर्धार -
३० मेपासून सुरू होणारे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने होणार असल्याचे स्पष्ट करत, राज्यभरातील मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून, सरकार या आंदोलनाकडे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.