सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची आरपीआयची मागणी

आपल्या मागण्यांसाठी आरपीआय आठवले गटाचे धरणे आंदोलन

<p>सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची आरपीआयची मागणी</p>

कोल्हापूर - कोरोना महामारीनंतर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना अब्दुल कलाम आर्थिक विकास महामंडळ, अपंग आर्थिक विकास महामंडळ या आर्थिक विकास महामंडळांच्या साहाय्याने सुरु करण्यात आलेले छोटे उद्योग चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांची कर्ज थकली आहेत. त्यामुळे राज्य शासनाने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली, त्याचप्रमाणे सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्यावतीने करण्यात आली आहे.

 या मागणीसाठी आरपीआयच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोरगरिबांची आणि भूमिहीनांची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्यात यावीत, राज्य आणि केंद्र शासनाच्या अखत्यारीतील बौद्ध लेण्यांचे पुरातत्व खात्यामार्फत संशोधन आणि संवर्धन करण्यात यावे, राज्य शासनाने अनुसूचित जाती, जमातींसाठी जाहीर केलेल्या कल्याणकारी योजनांचा निधी अन्यत्र खर्च करू नये, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा पक्षाचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी दिला आहे.

या धरणे आंदोलनात पक्षाचे राज्य सहसचिव बी के कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा सचिव सतीश माळगे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, किरण माने यांच्यासह आरपीआयचे इतर पदाधिकारी, आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.