मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई – ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज सकाळी मुंबईतील निवासस्थानी निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय ६८ वर्ष होते. आनंद नाडकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मानवी मनाची गुंतागुंत, सूक्ष्म बारकावे आणि मानसिक आजार याबाबत सामान्यांना समजेल अशा सहजसोप्या शैलीत ते लिखाण करत होते. मानसिक आजाराचा फार मोठा बाऊ न करता ही मानवी जीवनातील शारिरीक आजारासारखीच सामान्य बाब आहे, याबाबत त्यांनी अनेकांना जागरुक केले. एकूण मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' आणि 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटके लिहिलीत.