टाकवडे परिसरातील घरफोडीचा छडा...तिघे ताब्यात ; सव्वा सहा लाखाचा ऐवज जप्त
इचलकरंजी - टाकवडे रोड परिसरात उल्हास विठ्ठल भोसले हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. चार दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास घराला कुलूप लावून ते यड्राव येथील आपल्या भावाच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. या वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा तब्बल १० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
भोसले हे घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. चौकशीत पोलिसांना सराईत गुन्हेगार विनायक गजानन कुंभार लक्ष्मीकांत उर्फ तम्मा सैटू नाटेकर आणि अनिल कासाप्पा कल्याणी यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्यांच्यावर पाळत ठेऊन पंचगंगा नदी नाका परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील ६ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.