बदललेल्या रेखांकनातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा १९ मे रोजी मेळावा
मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरणार; सर्वपक्षीय आजी-माजी आमदार, खासदारांना निमंत्रण
कोल्हापूर : बदललेल्या रेखांकनानुसार प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्वपक्षीय मेळावा येत्या १९ मे रोजी सकाळी ११ वाजता कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे आणि प्रकाश पाटील यांनी दिली.
राज्य शासनाने ५ मे २०२६ रोजी बदललेल्या रेखांकनाची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ७८ गावे बाधित होत आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित गावांमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने गावागावांत निषेध सभा सुरू झाल्या आहेत.
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन रेखांकनानुसार महामार्ग झाल्यास महापुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. सुमारे ६ हजार एकर शेती बाधित होणार असून, त्याचा साखर कारखान्यांच्या ऊस गाळपावर परिणाम होईल. तसेच जंगली प्राण्यांचा त्रास वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पर्यावरणालाही धोका निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात आला.
बाधित शेतकऱ्यांशी विचारविनिमय करणे, जनजागृती करणे आणि लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सर्वपक्षीय आजी-माजी आमदार आणि खासदारांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. तसेच बाधित शेतकऱ्यांकडून विविध ठरावही मेळाव्यात मांडले जाणार आहेत.
१४ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जुने रेखांकन बदलण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर नवीन रेखांकनातील गावे आणि जमीन गट क्रमांकांचा समावेश असलेली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या रेखांकनानुसार हातकणंगले, पन्हाळा, करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यांतून हा महामार्ग जाणार आहे.
अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच संबंधित गावांची माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला होता. त्यानंतर गावागावांत उत्स्फूर्तपणे सभा घेऊन आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली असून, या सर्व बाधित शेतकऱ्यांचा एकत्रित जिल्हा मेळावा १९ मे रोजी पार पडणार आहे.