आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या आंदोलनास शरद पवार गटाचा पाठिंबा 

<p>आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या आंदोलनास शरद पवार गटाचा पाठिंबा </p>

कोल्हापूर – राज्यातील आंबा बागायतदार शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यात कोकणातील फळबाग शेती धोक्यात येण्याची सुरवात होत असल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त करून १५ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट) यांनी पाठिंबा देवून आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दिली. 
          आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर १५ मे रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चासंदर्भात राजू शेट्टी यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी सिल्वर ओक या निवासस्थानी खा. शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी, आंबा, काजू व नारळ उत्पादनाबाबत सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. फळबाग लागवड योजनेकडे आणि निर्माण झालेल्या प्रश्नातील राज्य सरकारच्या होत असलेल्या दुर्लक्षाबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता , नैसर्गिक आपत्ती, आंबा व काजू संशोधन केंद्राचे काम , आयात निर्यात धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 
          कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख व ३ लाख मदत द्या, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्यावरची लढाई सुरू आहे. राज्य सरकारने हेक्टरी २२ हजार रूपयाची तुटपुंजी मदत जाहीर करून बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळलेले आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड , पालघर, ठाणे या जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्यावतीने १५ मे रोजी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक मोर्चा काढला जाणार आहे. 
    या मोर्चासाठी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) , राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) , मनसे , स्वाभिमानी शेतकरी संघटना, माक्सवादी कम्युनिटी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी , जनता दल , शेतकरी कामगार पक्ष , धर्मराज्य पक्ष, कुणबी सेना या सर्व प्रमुख पक्षांचे आणि संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता गिरगांव चौपाटी येथील टिळक उद्यानात सर्व आंबा बागायतदार शेतकरी एकत्रित येवून वर्षा निवासस्थानावर धडक देणार आहेत.