राजकीय दबावतंत्र वापरल्यास शिस्तभंग कारवाईचा इशारा; बदलीबाबत महापालिकेचे परिपत्रक

<p>राजकीय दबावतंत्र वापरल्यास शिस्तभंग कारवाईचा इशारा; बदलीबाबत महापालिकेचे परिपत्रक</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम-२००५ तसेच संबंधित शासन निर्णयांच्या अनुषंगाने बदली धोरण तयार करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे.

महानगरपालिकेकडे कार्यरत अनेक अधिकारी व कर्मचारी बदलीसाठी वारंवार प्रशासनाकडे विचारणा करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बदली ही पूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने विशिष्ट ठिकाणी बदली करून घेण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर केल्यास ती कृती सेवा विषयक नियमांचा भंग मानण्यात येईल असा इशाराही परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील, असे परिपत्रकाद्वारे प्रशासनाने कळविले आहे.