कोल्हापुरात रिक्षा चालकांवर धडक कारवाई; 151 जणांना दंड, 77 हजार वसूल!
कोल्हापूर : शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त मोहीम राबवत रिक्षा चालकांवर मोठी कारवाई केली. 15 व 16 एप्रिल 2026 दरम्यान झालेल्या या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 151 रिक्षा चालकांकडून एकूण 77,000 दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान रिक्षा स्टँडवर अतिरिक्त रिक्षा उभ्या करणे, चौकात व सिग्नलवर वाहन थांबवून वाहतुकीत अडथळा निर्माण करणे, एसटी स्टँड परिसरात अनधिकृतपणे प्रवासी घेणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, तसेच प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे अशा विविध प्रकारचे नियमभंग आढळून आले.
तसेच, काही चालकांकडे वैध परवाना नसणे, स्टँड सोडून इतर ठिकाणी प्रवासी उचलणे आणि वाहन नियमांकडे दुर्लक्ष करणे हे प्रकारही समोर आले. या सर्व प्रकरणांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
दरम्यान, ड्रेसकोडचे पालन करणे, प्रवाशांशी नम्रतेने वागणे, नियमबाह्य भाडे न आकारणे आणि वाहतुकीस अडथळा न निर्माण करणे आवश्यक आहे. अन्यथा, पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना दिला आहे.