‘टक्केवारी’वरून भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये वाद

<p>‘टक्केवारी’वरून भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये वाद</p>

पुणे : तीन कोटी रुपयांच्या निविदेतील ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेवकांमध्ये वाद उफाळल्याची घटना समोर आली आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे महापालिकेच्या कार्यालयातच विद्यमान नगरसेविका रोहिणी चिंते आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात तीव्र वादावादी झाली.

पुणे महानगरपालिकेत ‘टक्केवारी’च्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, यावेळी हा वाद थेट सत्ताधारी भाजपच्या गोटातच पेटल्याचे दिसून आले. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून हा वाद उद्भवला. विद्यमान नगरसेविका रोहिणी चिंते आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात वादावादी होवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत शिवीगाळ झाल्याचे समोर आले आहे. तीन कोटी रुपयांच्या निविदेत ‘टक्केवारी’ मागितल्यामुळे काम रोखल्याचा आरोप राजश्री काळे यांनी केला आहे. मात्र, रोहिणी चिंते यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.