वादळी ठरण्याची शक्यता; कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा 20 एप्रिलला

<p>वादळी ठरण्याची शक्यता; कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा 20 एप्रिलला</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सभा क्रमांक ५ ही सर्वसाधारण सभा सोमवारी, २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली असून, विविध संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे ही सभा ‘वादळी’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या पुरवणी कार्यपत्रिकेत शहर विकासाशी संबंधित अनेक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विकास योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव, सार्वजनिक शौचालयांवर जाहिरात फलक लावण्यासाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती, तसेच हुतात्मा पार्क येथे महावीर चक्र विजेते ब्रिगेडियर अरुण भीमराव हरोलीकर यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव यांचा समावेश आहे.

याशिवाय, छत्रपती शिवाजी उद्यमनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ते राधाकृष्ण मंदिर या रस्त्याला ‘केशवराव ज्ञानदेव जाधव मार्ग’ असे नामकरण करण्याचा ठरावही सभेत मांडण्यात येणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना शासन निर्णयानुसार नोकरी देण्याच्या मुद्द्यावरही जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

बागल चौक येथील दीर्घकाळ बंद असलेली शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचा विषय, तसेच सदस्यांच्या प्रश्नांना लेखी उत्तर देण्याबाबतचा मुद्दाही सभेत चर्चेला येणार आहे.

दरम्यान, तृतीयपंथीयांसाठी विशेष आरक्षण, कायमस्वरूपी नोकरीच्या संधी आणि तक्रार निवारणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. तसेच सि.स. नं. २८०४ येथील प्रस्तावित दिव्यांग भवनाऐवजी विरंगुळा पार्क उभारण्याच्या ठरावावरही मतभेद उफाळण्याची शक्यता आहे.

एकूणच, विविध महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांमुळे येत्या २० एप्रिलची महापालिका सभा चांगलीच गाजण्याची आणि वादळी ठरण्याची शक्यता प्रशासन आणि राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.