संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करा : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यात निर्धार
कोल्हापूर – गरज नसलेला शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी आमचा लढा कायम राहील, असा निर्धार आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. आजऱ्यातील शिवाजी सावंत सभागृहात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने संभावित नवीन अलाइनमेंट मधील गावातल्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी, या महामार्गामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला. यावेळी गट नंबर आल्यानंतर जिल्हा आणि तालुकावार मेळावे घेत हळूहळू आंदोलन न थकता तीव्र करण्याचा ठराव सर्व संमत करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी , शेतकऱ्यांचा संघटित दोन वर्षे विरोध असल्याने या महामार्गाची अलाइनमेंट बदलली आहे. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत नाही. पण कोल्हापुरातील शेतकरी जिद्दीला पेटला आहे. दुसऱ्या अलाइनमेंट विरोधात देखील हळूहळू आंदोलनाची व्याप्ती वाढवत मेळावे घेऊन संघर्ष उभारू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्ग विरोधातल्या आंदोलनाचे मुख्य केंद्र हे कोल्हापूर राहील. पैशाच्या आमिषाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शेतकऱ्यांना शक्तिपीठाच्या महामार्गासाठी जमीन देण्याकरिता एजंट नेमणूक करण्यात आली आहेत. टक्केवारी वर गावागावात माणसं नेमली गेली आहेत, 1000 पोरांची टीम तयार केलीय त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्तीपीठ रस्त्यासाठी जागा देण्याकरिता तयार केलं जातंय ,त्याला शेतकऱ्यांनी फसून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी, मूठभर ठेकेदारांना आणि समर्थन करणाऱ्या सरकारमधील आमदारांना फायदा करून देण्यासाठी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो आहे. शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सरकारने सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान शेट्टी यांनी दिले आहे.
माजी आमदार राजेश पाटील यांनी, चंदगड मध्ये जैवविविधता, पर्यावरण यांना हानी पोहोचून जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शिवारात आणि घरात शिरतील अशी भीती व्यक्त केली. या महामार्गाचा अट्टाहास हे स्थानिक आमदाराचे अज्ञान दर्शवते, अशी टीकाही त्यांनी केली.
गिरीश फोंडे यांनी, भोंदू बाबा अशोक खरात याने शक्तिपीठ महामार्गात जमीन खरेदी केली असल्याचे सांगून याची चौकशी करण्याची मागणी केली. या महामार्गामध्ये कंत्राटदारांचे हितसंबंध असून सरकार कंत्राटदारांसाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
संपत देसाई यांनी आपल्या भाषणात या महामार्गामुळे पर्यावरण तर धोक्यात येईलच पण स्थानिक लोक संस्कृती लयास जाईल अशी भीती व्यक्त केली. या अगोदरच्या प्रकल्पात विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यातच शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक ,जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई ,तानाजी देसाई, सुनील शिंत्रे, संजय तरडीकर, राजेंद्र गड्ड्यांवर, युवराज जाधव, मुकुंद देसाई, सम्राट मोरे, यांचीही भाषणे झाली.
यावेळी गोकुळ संचालक प्रकाश पाटील, अरविंद देसाई, संदीप देसाई ,अंजनाताई रेडेकर, अभिषेक शिंपी, रवींद्र बाटले, प्रकाश मोरुजकर ,कृष्णा भारतीय ,निवृत्ती कांबळे,, अभिजीत शिंपी, संजय सावंत, अशोक तरडेकर, संजय तरडेकर, सचिन घोरपडे, सर्जेराव देसाई, तानाजी देसाई यांची उपस्थिती होती.