स्वच्छतेवर आयुक्तांचा ‘कडक डोस’; हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
कोल्हापूर : शहरातील ढिसाळ स्वच्छता व्यवस्थेवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज थेट बोट ठेवत अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. वेळापत्रकाचे काटेकोर पालन, कामातील शिस्त आणि जबाबदारी याबाबत तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी स्वच्छता यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले.
ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. सर्व आरोग्य निरीक्षकांनी सकाळी ६ वाजता आपल्या वॉर्डमध्ये हजर राहणे बंधनकारक करण्यात आले असून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सकाळी ६.२० पर्यंत बायोमेट्रिक हजेरी नोंदवून ६.३० पर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले.
मुकादमांनी केवळ देखरेख न करता स्वतः प्रत्यक्ष कामात उतरावे, तसेच कामाचे नियोजन, साहित्याची उपलब्धता आणि अंमलबजावणी यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व सुविधा उपलब्ध करूनही कामात कसूर आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला.
कार्यालयीन कामाच्या नावाखाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यास मनाई करण्यात आली आहे. क्षेत्रातील काम पूर्ण केल्यानंतरच कार्यालयीन काम करण्याचे आदेश देण्यात आले असून दुपारी ३ ते ५ या वेळेत कार्यालयात उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
दर १५ दिवसांनी कामाचा आढावा आणि दरमहा मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच शहरातील हॉटेल्स, हॉकर्स आणि खाऊ विक्रेत्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्याकडील कचरा नियमित उचलणे आणि स्वच्छता सेवा शुल्क आकारणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुख्य रस्त्यांसाठी विशेष स्वच्छता मोहीम, शनिवार-रविवारी प्रभागनिहाय पाहणी आणि ‘१०० टक्के कचरा उठाव’ यावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
बैठकीस उपआयुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, हेमंत काशीद तसेच सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.