थकबाकी असलेल्या गाळ्यांना ३१ मेपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा १ जूनपासून गाळे सील : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

<p>थकबाकी असलेल्या गाळ्यांना ३१ मेपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा १ जूनपासून गाळे सील : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड</p>

 

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे थकबाकीदार गाळेधारकांनी येत्या ३१ मे २०२६ अखेर थकीत रक्कम भरावी, अन्यथा १ जून २०२६ पासून संबंधित गाळे सील करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल, अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाची आढावा बैठक आज दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी गाळेधारकांच्या थकबाकीचा सविस्तर आढावा घेतला.

 महानगरपालिकेच्या बहुतांश गाळेधारकांची मुदत सन २०१५ मध्येच संपलेली आहे. शासन निर्णयानुसार महानगरपालिकेकडून ५ टक्के भाडेवाढ गृहीत धरून भाडे आकारणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ २० ते ३० टक्के व्यावसायिकच नियमित भाडे भरत असून उर्वरित गाळेधारकांकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढत आहे. महानगरपालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर शहर विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे सर्व थकबाकीदारांना ३१ मे २०२६ पर्यंत अंतिम संधी देण्यात यावी आणि त्यानंतर थकबाकीदार गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश बैठकीत त्यांनी दिले.

ज्या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे व ज्यांना कलम ८१ (ब) अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा गाळ्यांचा तातडीने लिलाव प्रक्रियेद्वारे पुनर्वाटप करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच खुल्या जागेची थकबाकी असलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महानगरपालिकेचे हॉल, भाजी मार्केट व पार्किंग व्यवस्था यांच्या निविदा प्रक्रिया राबवून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. याशिवाय हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे सध्याच्या स्थितीत लिलावाद्वारे एजन्सीला देण्याचा प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

या बैठकीस उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे व इस्टेट विभागातील कर्मचारी उपस्थित होते.