अर्ध सभागृह रिकामं...! जेवणानंतर 40 टक्के नगरसेवक गायब
कोल्हापूर - महानगरपालिकेच्या पाचव्या सर्वसाधारण सभेत आज जेवणानंतर नगरसेवक गैरहजर राहिल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या गैरहजेरीत सत्ताधारी गटातील नगरसेवकांची संख्या लक्षणीय असल्याने या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
राजर्षि छत्रपती शाहू सभागृहात सुरू असलेली सभा दुपारी सुमारे दीड वाजेपर्यंत पार पडली. त्यानंतर जेवणासाठी एक तासाची विश्रांती घेण्यात आली. मात्र, विश्रांतीनंतर सभा पुन्हा सुरू होताच सुमारे 40 टक्के नगरसेवक सभागृहात अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
शहरातील विविध प्रभागांमधील नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी व विकास कामांना गती देण्यासाठी नगरसेवकांना निवडून दिले आहे. अशा वेळी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान नगरसेवकांनी अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे. विशेषतः सत्ताधारी गटातील नगरसेवकांची अनुपस्थिती ही त्यांच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे. सभेत अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याबाबत अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे