...आणि विमानाचा अपघात होता होता टळला : प्रवाशांनी जिवाच्या आकांताने ओरडत देवाकडे केली प्रार्थना
हैदराबाद – अहमदाबाद एअर इंडियाचा भीषण अपघात त्यानंतर अजित पवार यांचा विमान अपघात यामुळे विमानाने प्रवास करण्याविषयी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असताना कर्नाटकमध्ये विमानाचा थरारक अपघात होता होता टळला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
फ्लाय-९१ या विमान कंपनीचे विमान आयसी ३४०१ ने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथून रविवारी दुपारी तीन वाजता उड्डाण घेतले. हे विमान हुबळी येथे सायंकाळी साडेचार वाजता लँड होणार होते. हुबळी विमानतळावर लँडिंगच्या तयारीत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिकाला लँडिंग रद्द करुन विमान माघारी फिरवावे लागले. यानंतर सुमारे चार तास हे विमान हवेतच घिरट्या घालत होते. अखेर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले आणि मोठी दुर्घटना टळली. यावेळी विमानातील प्रवासी पूर्णपणे घाबरुन गेले होते. विमानात प्रवासी जिवाच्या अकांताने ओरडत, किंचाळत आणि देवाची प्रार्थना करत होते. काही प्रवासी भीतीतून रडताना व्हिडीओत दिसत आहेत.