इचलकरंजी – इचलकरंजी शहरातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी गुजरातमध्ये सापडली आहे. या प्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे.
शहरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक डॉ. आरती कणिरे तपास करत होत्या. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलीचे लोकेशन गुजरातमधील भावनगर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुजरात मध्ये जाऊन अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. मध्य प्रदेशातील एका युवकानं इन्स्टाग्रामवरून मुलीशी ओळख करून तिला घरातून नेल्याची माहिती समोर आली.
लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि तिला जबरदस्तीने गुजरातमध्ये डांबून ठेवल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशातील संशयित आरोपी राहूल दामोर याला अटक केली आहे.



