ब्रेकिंग न्यूज
Blog

शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

एस न्यूज प्रतिनिधी अपडेट: 29 August 2026, 5:32 PM 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर : घरात झोपलेल्या व्यक्तीला नावाने हाक मारत घराबाहेर येण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील सोनटक्के तालीम परिसरात घडली.

याबाबत फारुक बाबासाहेब खान (वय ३३, रा. सोनटक्के तालीम, रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिंदे सेनेचे पदाधिकारी कपिल केसरकर (रा. गंजी गल्ली, शिवाजी चौक), महेश नलवडे (रा. उत्तरेश्वर पेठ), प्रभू गायकवाड (रा. कळंबा), उदय भोसले (रा. जुना बुधवार पेठ), बंडा लोंढे (रा. कळंबा) आणि उमेश रेळेकर (रा. बुरुड गल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी खान हे घरी झोपले असताना घराबाहेर रस्त्यावर काही जण त्यांचे नाव घेऊन शिवीगाळ करत असल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. कोण शिवीगाळ करत आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता वरील सहा जण घराजवळ उभे असल्याचे दिसले. यावेळी कपिल केसरकर यांनी खान यांना अश्लील शिवीगाळ करत घराबाहेर येण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहायक फौजदार वरक करीत आहेत.

दरम्यान, शिंदे सेनेचे पदाधिकारी कपिल केसरकर याच्यावर शुक्रवारी रात्री जुना राजवाडा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल झालाय.

संबंधित विषय

Scroll to Top