गुजरीतील सराफ व्यावसायिकावर जमावाचा हल्ला

धमकीचा ऑडिओ, व्हिडिओ चर्चेत असतानाच धारदार हत्याराने डोक्यात वार; दहा जणांवर गुन्हा

कोल्हापूर : सोन्याच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारावरून निर्माण झालेल्या वादाची माहिती सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांसमोर मांडल्याच्या रागातून गुजरीतील सराफ व्यावसायिक प्रदीप शांतीलाल राठोड (वय ३५, रा. कसबा गेट, गंगावेश) यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. कासार गल्ली परिसरात झालेल्या या हल्ल्यात राठोड यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करण्यात आला. त्यांना गंभीर दुखापत झाली असून, उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राठोड यांचे महादेव गल्ली, गुजरी येथे सराफी दुकान आहे. सोन्याच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारावरून दोन दिवसांपूर्वी त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. यानंतर राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही व्यक्तींची नावे घेतली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांच्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी सायंकाळी राठोड हे कासार गल्ली परिसरातील चहाच्या टपरीजवळ थांबले असताना आठ ते दहा जण त्यांच्या जवळ आले. ‘तू कोणाचे नाव घेतोस?’ अशी विचारणा करत त्यांनी राठोड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमी राठोड यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी शिंदे सेनेचे पदाधिकारी कपिल केसरकर, बंडा लोंढे, उदय भोसले, चिंचनीकर, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

धमकीनंतर काही तासांतच हल्ला…

सोन्याच्या देवाण-घेवाणीच्या वादातून शिंदे सेनेचे पदाधिकारी कपिल केसरकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्याला फोनवरून धमकी दिल्याची माहिती प्रदीप राठोड यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर दिली होती. या संदर्भातील ऑडिओही सोशल मीडियावर चर्चेत होता. राठोड यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये काही व्यक्तींची नावे घेतली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्यावर जमावाने हल्ला केल्याने या घटनेबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण, हल्ल्यात सहभागी असलेल्यांची संख्या आणि या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. राठोड यांच्या तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

Scroll to Top