कोल्हापूर – राधानगरी तालुक्यात घरफोडी, किरकोळ चोऱ्यांसह शेतातील पाण्याच्या मोटारींच्या कॉपर वाइंडिंग चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या घटनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता गावाच्या सुरक्षेसाठी एकजुटीने पुढे यावे, प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून रात्रीची गस्त सुरू करावी, असे आवाहन राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केले आहे.
राधानगरी तालुक्यात घरफोडी आणि किरकोळ चोऱ्यांसह शेतातील पाण्याच्या मोटारींच्या कॉपर वाइंडिंग चोरीच्या घटना वाढल्या आहेत. भौगोलिक दृष्ट्या राधानगरी तालुका विस्तीर्ण असल्याने तालुक्यात वाढलेल्या चोरीच्या घटनां रोखण्यास पोलिसांना मर्यादा येत आहेत. चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांची बैठक आयोजित करावी. त्यामध्ये गावातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी आणि रात्रीच्या वेळी सामूहिक गस्त घालावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केले आहे.
ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे चोरट्यांच्या हालचालींना आळा घालण्यास मदत होणार आहे. घर बंद करून बाहेरगावी जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. शक्य असल्यास शेजारी किंवा विश्वासू व्यक्तीला घराची माहिती द्यावी. तसेच काही दिवसांसाठी गावाबाहेर जाणार असल्यास पोलिसांना माहिती द्यावी. गावात किंवा शेत परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांची धावपळ होण्यापेक्षा चोरी रोखण्यासाठी ग्रामस्थांनीच दक्षतेची साखळी उभी करणे गरजेचे आहे. ‘गावाची सुरक्षा, गावकऱ्यांची जबाबदारी’ या भावनेतून ग्रामसुरक्षा दलाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास चोरट्यांवर वचक निर्माण होऊन ग्रामीण भागातील सुरक्षेला बळ मिळणार आहे.




