तासगाव परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा...पाच लाखाचे नुकसान

<p>तासगाव परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा...पाच लाखाचे नुकसान</p>

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील तासगाव परिसराला बुधवारी  सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या वादळामध्ये धनाजी कांबळे यांच्या नवीन  घराच्या  भिंती पडल्या असून छत उडून गेले आहे. यामध्ये  सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच महिपती पाटील यांच्या जनावरांच्या पत्र्याचे शेड पडल्याने  त्यांचे  एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर रावसाहेब पाटील यांच्या घराच्या छताचे पत्रे उडून जाऊन शंभर मीटरवर असलेल्या अनिल पाटील यांच्या घरावर पडल्याने या दोन्ही कुटुंबाचे मिळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 पेठ वडगाव ते तासगाव रस्त्यावरील काही झाडे या वादळात उन्मळून  पडली आहेत. सावर्डे परिसरालाही वादळाचा तडाखा  बसला असून पेठ वडगाव ते हातकणंगले रोडवरील झाडे  उन्मळून पडल्याने  काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती समजतात सरपंच चंद्रकांत गुरव, माजी सरपंच शिवाजीराव पाटील, तलाठी सय्यद यांनी त्या परिसराला भेट दिली. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.