महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या कामकाजाचा आयुक्तांनी घेतला आढावा

 

<p>महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या कामकाजाचा आयुक्तांनी घेतला आढावा</p>

<p> </p>

कोल्हापूर - महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या कामकाजाचा  महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आढावा घेतला. यावेळी महसूल वाढ, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई आणि नियमित पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

ताराराणी चौकातील  पाण्याची टाकी पाडण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच शहरातील अनधिकृत नळजोडण्या, सार्वजनिक नळांचा गैरवापर आणि जुन्या वितरण नलिकांवरील कनेक्शन यांचे सर्वेक्षण करून माहिती सादर करण्यास सांगण्यात आले. गैरवापर आढळल्यास संबंधित जोडण्या बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महसूल वाढीसाठी किमान १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील टॉप ५० थकबाकीदारांवर तातडीने  कारवाई करून वसुली करावी आणि  ग्रामपंचायतींकडील थकबाकीही वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मीटर रीडर यांच्या कामाचे विश्लेषण करून बिलिंग, वसुली आणि अनधिकृत कनेक्शन शोधण्याच्या कामात सुधारणा करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर असमाधानकारक काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

शहरातील सुरू असलेल्या बांधकामांना औद्योगिक दराने पाणी बिल आकारले जाते का ? याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींवरील नळजोडण्यांना मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

संभाव्य हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या गावांच्या पाणी पुरवठ्याचे  नियोजन तयार ठेवण्याबाबतही चर्चा झाली. याशिवाय पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रील्स तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.  या बैठकीला  अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह उपजल अभियंता, शाखा अभियंते आणि मीटर रीडर उपस्थित होते.