जर कधी मला एखादी बायोपिक करावीशी वाटलीच, तर ती अजितदादांवर असेल... : निर्माते प्रवीण तरडे यांचे वक्तव्य
मुंबई – जर कधी मला एखादी बायोपिक करावीशी वाटलीच, तर ती अजितदादांवर असेल... कारण, अजितदादांना मी जवळून पाहिलंय. त्यांची काम करण्याची पद्धत अनुभवली आहे, असे वक्तव्य निर्माते प्रवीण तरडे यांनी केले आहे. ते एका मुलाखती दरम्यान बोलत होते.
"सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा मंत्री मी दादांच्या रूपात पाहिलाय. मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही कदाचित त्यांच्या पावलांची सवय झाली असेल. आजही त्या पायऱ्या म्हणत असतील की, सकाळी सकाळी धावत येणारी ती पावलं कुठे गेली? इतकी कामाशी नाळ जोडलेली माणसं फार कमी पाहायला मिळतात... त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, वेग, दबाव आणि कामाचा ध्यास हा सिनेमाचा विषय होऊ शकतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं...", असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लवकरच चित्रपट निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.