श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा उत्साहात 

<p>श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा उत्साहात </p>

कोल्हापूर - कृष्णा नदीच्या वाढत्या पुराच्या पाण्यामुळे आज मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास श्री दत्त महाराजांच्या चरण कमलावरून पुराचे पाणी मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडले आहे. यावेळी मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे  दक्षिणद्वार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी  "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..." या अखंड नामघोषाने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमून गेली होती.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी मंदिरात प्रवेश करते. पूराचे पाणी श्री दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजातून (दक्षिणद्वारातून) पुढे वाहू लागते. या पवित्र आणि दुर्मिळ क्षणालाच "दक्षिणद्वार सोहळा" असे संबोधले जाते. हा सोहळा दत्तभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि आध्यात्मिक आनंद देणारा मानला जातो. यावेळी असंख्य भाविक पवित्र स्नान करून दक्षिणद्वार सोहळ्याचे दर्शन घेतात.