‘दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप’ : आ. सतेज पाटील यांचे पत्र 

<p>‘दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप’ : आ. सतेज पाटील यांचे पत्र </p>

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी तुमच्या दूध संस्थेचा ठराव तुमच्या नावावर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे पत्र आ. सतेज पाटील यांचे प्रमुख कार्यकर्ते सर्व ठराव धारकांना प्रत्यक्ष भेटून देत आहेत.
राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून आ. सतेज पाटील यांनी ठराव धारकांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, गोकुळचे शिल्पकार कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोकुळ दूध संघाला प्रगतीपथावर नेले. गोकुळने जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर १० दिवसाला ८० कोटी रुपयाचे दुधाचे बिल देवून खऱ्या अर्थाने अर्थक्रांती घडवून आणली आहे.

गोकुळच्या गेल्या निवडणुकीमध्ये दुधाला २ रुपये जादा दर देण्याचा शब्द मी दिला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षात म्हैशीच्या दुधाला १४ रुपये आणि गायीच्या दुधाला १० रुपये प्रति लिटर दरवाढ देवून हा शब्द पाळला आहे. त्याबरोबरच गोकुळ दूध संघ, संघाशी संलग्न दूध संस्था, दूध उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा कारभार माझ्या नेतृत्वाखाली झाल्याचे समाधान आहे.

गोकुळच्या प्रगतीमध्ये दूध उत्पादक शेतकरी आणि माता-भगिनी यांचा मोठा वाटा आहे. शेतकरी आणि माता-भगिनी यांनी पहाटेपासून घाम गाळून, शेणा-मुतात हात घालून केलेल्या कष्टामुळेच गोकुळ नावारुपाला आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप आहेत. दूध उत्पादकांचा सन्मान, दुधाला जास्तीत-जास्त दर मिळवून देणे, गोकुळ दूध संघ टिकविणे हाच माझा प्रयत्न आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये गट-तट तसेच पक्ष बाजूला ठेवून आपण राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला सहकार्य आणि आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती मी आपणांस करत आहे.

गोकुळच्या विकासाची जबाबदारी मी तसेच आमच्या समविचारी आघाडीचे उमेदवार निश्चितपणे पार पाडू, अशी ग्वाही या निमित्ताने देतो. तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून गोकुळ टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कटिबध्द राहूया. धन्यवाद !