गांधीनगर अनधिकृत प्रकरणाबाबत शासनाने दाखवलेली तत्परता ऐतिहासिक वारसा संवर्धनाबाबत कधी दाखवणार : प्रजासत्ताक संस्थेचा सवाल
कोल्हापूर – गांधीनगर अनधिकृत बांधकाम प्रकरणामध्ये नगर विकास विभागाने दाखवलेल्या जलद गतीप्रमाणे कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीही तितकीच तत्परता दाखवावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयासह नगरविकास विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी २०१३ पासून सातत्याने हेरिटेज समिती नियुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. समितीची नियुक्ती झाल्यानंतरही तिच्या कामकाजातील त्रुटी आणि ऐतिहासिक वास्तूंच्या होत असलेल्या नुकसानीबाबत २०१८ पासून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.
सध्या शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू आणि वारसास्थळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हेरिटेज समितीच्या कामकाजाची चौकशी करण्याबाबतची तक्रार गेल्या सात वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे.
गांधीनगर प्रकरणात शासनाने अवघ्या १७ दिवसांत बैठक घेऊन आदेश जारी केला तीच तत्परता ऐतिहासिक वारसा संवर्धनाबाबत शासन का दाखवत नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी, विद्यमान मुदतबाह्य हेरिटेज समिती तात्काळ बरखास्त करणे, समितीच्या निर्णयांची व ऐतिहासिक वास्तूंच्या नुकसानीची चौकशी करणे आणि कायद्यानुसार नवीन तज्ज्ञ समितीची नियुक्ती करून कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचे प्रभावी संवर्धन करणे, आदि मागण्या केल्या आहेत.