कसबा सांगाव मतदारसंघात खळबळ; सुवर्णा कांबळे यांचं जात प्रमाणपत्र रद्द
कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीचा निर्णय; उच्च न्यायालयात दाद मागणार
कागल : कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा रणजित कांबळे यांचा जातवैधता दावा कोल्हापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवला आहे. समितीने त्यांच्या "महार" जातीचे प्रमाणपत्र रद्द व अवैध घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.
कसबा सांगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार प्रतिभा लखन हेगडे यांनी सुवर्णा कांबळे यांच्या जातवैधतेविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुनावणी करताना समितीने सादर करण्यात आलेली कागदपत्रे, पुरावे, लेखी व तोंडी युक्तिवाद तसेच पोलिस दक्षता पथकाचा अहवाल यांची सखोल छाननी केली.
तपासणीदरम्यान अर्जदारांचा महार जातीचा दावा तसेच १० ऑगस्ट १९५० पूर्वी महाराष्ट्रातील वास्तव्यासंदर्भातील आवश्यक पुरावे सिद्ध झाले नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींसाठी असलेल्या घटनात्मक लाभांस त्या पात्र ठरत नसल्याचा निष्कर्ष समितीने नोंदवला.
समितीने तक्रारदार प्रतिभा हेगडे यांची तक्रार ग्राह्य धरत सुवर्णा कांबळे यांचा जातवैधता दावा अमान्य केला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, राधानगरी-कागल यांनी जारी केलेले जातीचे प्रमाणपत्र जप्त करून रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या निर्णयाविरोधात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २२६ अन्वये उच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग खुला असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना तक्रारदार प्रतिभा लखन हेगडे म्हणाल्या, "न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास होता. विरोधी उमेदवाराकडून चुकीची कागदपत्रे जोडून नामनिर्देशन करण्यात आले होते. शेवटी विजय सत्याचाच झाला. सुमारे दहा हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याचाच हा विजय आहे."
तर जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा रणजित कांबळे यांनी, "मतदारसंघातील जनतेने मला भरघोस मतदान करून निवडून दिले आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार असून न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल," अशी प्रतिक्रिया दिली.