‘जसंच्या तसं वाचलं गेलं, ही चूक घडली’ : विधानसभा अध्यक्षांकडून अधिवेशनात दिलगिरी
मुंबई – पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या शोक प्रस्तावाचे वाचन करताना अशुद्ध उच्चार झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होवू लागली आहे.
यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनात सर्वांची दिलगिरी व्यक्त केली. यावेळी नार्वेकरांनी म्हटले आहे कि, “सन्मानीय सदस्यांना एक खुलासा करू इच्छितो. आपल्या अधिवेशनच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे आपण शोकप्रस्ताव घेत असतो. शोकप्रस्ताव केवळ अध्यक्ष वाचून दाखवणार हा निर्णय घेण्यात आला होता. त्यादिवशी १२ शोकप्रस्ताव होते. त्याचं वाचन मी सभागृहात केले. १२ शोकप्रस्ताव असल्याने जे प्रिंट आले होते, ते बारीक फॉन्टमध्ये होते आणि अस्पष्ट होते. त्यात काही तांत्रिक चुका होत्या. त्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना जसंच्या तसं वाचलं गेलं. ही चूक घडली.”
“स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही राज्यातील व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे, निश्चितच विधानसभेचे अध्यक्ष मुळीच असे वक्तव्य करू शकत नाहीत. जे घडलं ते एका चुकीमुळे घडलं आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नये, अशी विनंती करतो. त्या भाषणावेळी राज्यातील, सभागृहातील कोणत्याही व्यक्तीचे मन दुखले असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असे त्यांनी म्हटले आहे.