आवळी फाट्याजवळ टायरने भरलेल्या ट्रकला आग... लाखाचे नुकसान
कोल्हापूर – आज पहाटे आयशर ट्रक बेळगावहून - रत्नागिरीकडे सुमारे २० लाख रुपये किंमतीचे नवीन टायर घेऊन जात होता. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आवळी फाटा येथून आल्यानंतर हा ट्रक रस्त्याकडेच्या डीव्हायडरला धडकला. त्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग लागताच चालक येलगुंड यल्लाप्पा धनोरधर हा सुखरूप बाहेर पडला. मात्र काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अंमलदार अतुल निकम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोल्हापूर आणि मलकापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र ट्रकसह त्यामधील टायर जळून खाक झाल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.