शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात निर्धार

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

<p>शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात निर्धार</p>

कोल्हापूर -  शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांतून होत असलेला तीव्र विरोध लक्षात आल्यानंतर विधानसभा निवडणुकीपुर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा शक्तिपीठ महामार्गाचे नव्याने रेखांकन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कोल्हापूरात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याला ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना वसंत भोसले यांनी, वेगवेगळे महामार्ग तयार करण्याचे सरकारचे हे मॉडेल म्हणजे रस्ता बनवण्याचे मॉडेल नसून पैसा मिळवण्याचे मॉडेल आहे, असा आरोप केला. कोल्हापूर जिल्ह्याने कष्टाने आणि त्यागाने मिळवलेले समृद्ध असे वैभव नष्ट करण्याचे काम शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सरकार करतय, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिथे कसलीही शक्ती नाही, कोणतेही पीठ नाही अशासाठी राज्य सरकारचा अट्टाहास का ? असा प्रश्न उपस्थित करत हजारो कोटी रुपयांच्या कमिशनसाठी सरकार शक्तीपीठ महामार्ग करतय, असा आरोप केला.

दरम्यान या मेळाव्यात बोलताना वाकरे येथील शेतकरी भीमराव पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधारी आमदार चंद्रदीप नरके यांना आपण जाब विचारणार असल्याचे सांगितले.

या मेळाव्यात जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, सुनील चौगले, नामदेव गिरी, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, शहरप्रमुख विशाल देवकुळे यांनीही मनोगते व्यक्त करताना राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक सुनील मोदी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख रीमा देशपांडे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, गगनबावडा तालुका प्रमुख सतीश पानारी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.