तुम्ही त्या चिमुकलीची आठवण ठेवून जल्लोष साजरा करायला नको होता...: चिमुकलीच्या घटनेवर खा. प्रणिती शिंदे मुख्यमंत्र्यांवर संतापल्या
मुंबई – काल देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आसाम या राज्यात विजयाची बाजी मारली. या विजयाचा जल्लोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी पेढे वाटून साजरा केला. परंतु राज्यात साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून झालेल्या हत्येवर संताप व्यक्त केला जात असताना राज्याचे गृहमंत्री जल्लोष साजरा करताना दिसल्याने काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांनी, “तुम्ही त्या चिमुकलीची आठवण ठेवून जल्लोष साजरा करायला नको होता”, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या कि, संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आणि सोलापुरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय. शक्ती कायदा लागू करून 15 दिवसात फाशी झाली असती. उलट मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना काल पेढे भरवत जल्लोष केला, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान यांना केवळ निवडणुका महत्वाच्या आहेत. तुम्ही त्या चिमुकलीची आठवण ठेवून जल्लोष साजरा करायला नको होता. माणुसकी यांच्यात राहिलेली नाही, नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. सोलापुरात दिवसा ढवळ्या लोकांच्या हत्या होत आहेत. महाराष्ट्रमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे, महाराष्ट्रमध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडलेली आहे.
मुख्यमंत्री महोदयांना पण मुलगी आहे, आपण या घटनेकडे ज्यावेळी बघतो, त्यावेळी अंगावर शहरे येतात. विकृत मानसिकता वाढत जातेय, वरपासून खालीपर्यंत यांना समर्थन मिळतं. अशा लोकांना वाव मिळतो म्हणून विकृती वाढतेय. या व्यक्तीवर या आधी दोन वेळा गुन्हे दाखल होते मग हा सुटला कसा? कोणी सोडलं याला? मुलीच्या तोंडात सॉक्स कोंबन्यात आलेलं होतं, कारण ती आवाज करू नये म्हणून, ही घटना इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री मजा करत फिरतायत, वरपासून खालीपर्यंत सर्वांना बदललं पाहिजे, ताबडतोब राजीनामे व्हायला पाहिजे आणि नराधमला फाशी झाली पाहिजे.