अखेर गोकुळ दुध संस्थेवर प्रशासकांची नियुक्ती...
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ आज संपला आहे. या संचालक मंडळाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने गोकुळवर तब्बल ६३ वर्षानंतर पहिल्यांदा प्रशासकीय मंडळाची नियुक्त करण्यात आली आहे.
पुणे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्या आदेशानुसार नियुक्त प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून सातारा येथील जिल्हा उपनिबंधक संजयकुमार विश्वनाथ सुद्रीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून प्रदीप महावीर मालगावे (सहायक निबंधक, चंदगड), सुनिल रामचंद्र धायगुडे (सहायक निबंधक, मुळशी), सागर बलकवडे (लेखापरीक्षक) आणि चंद्रकांत परूळेकर (कक्ष अध्यक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) नियुक्ती करण्यात आली आहे.
हे प्राधिकृत अधिकारी मंडळ गोकुळ संघाचे दैनंदिन कामकाज पाहणार आहे. तसेच कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.