गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढा मुख्यमंत्र्यांचे आदेश,अफवांवर विश्वास ठेवू नका.. -अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती

<p>गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढा मुख्यमंत्र्यांचे आदेश,अफवांवर विश्वास ठेवू नका.. -अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती</p>

मुंबई - गोकुळ दूध संघाच्या बहुचर्चित निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ही निवडणूक तात्काळ जाहीर करून महायुती म्हणूनच एकत्र लढविण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, अपुऱ्या माहितीवर आधारित बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे  आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मंगळवारी रात्री महायुतीतील प्रमुख नेत्यांची सुमारे दीड तास बैठक पार पडली. या बैठकीत गोकुळ निवडणुकीसंदर्भातील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्या कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी, त्यावरचे संभाव्य उपाय आणि निवडणूक प्रक्रियेचा पुढील आराखडा यावर व्यापक विचारमंथन झाले. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच, कायदेशीर अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कायदे सल्लागारांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. महायुतीने एकत्रितपणेच ही निवडणूक लढवावी, हा स्पष्ट संदेश सर्व नेत्यांना देण्यात आला.

बैठकीला भारतीय जनता पार्टीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनयराव कोरे, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजी पाटील, युवा नेते समित कदम आदी  नेतेमंडळी उपस्थित होती.  

अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले की, “४ मे २०२६ रोजी परिस्थिती पूर्णतः स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. कार्यकर्त्यांनी आणि जनतेने संयम बाळगावा.”