मोलकरणी-प्रियकराच्या संगनमताचा पर्दाफाश; ७.२२ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

<p>मोलकरणी-प्रियकराच्या संगनमताचा पर्दाफाश; ७.२२ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त</p>

कोल्हापूर : घरात काम करणाऱ्या मोलकरणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा पर्दाफाश करत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तब्बल ७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत राहुल नारायण हावळ (वय ३९, व्यवसाय सराफ, रा. राजारामपुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ९ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रतिभानगर परिसरातील घरातून ही चोरी झाली होती.

तपासादरम्यान मोलकरीण वैशाली सिद्धाप्पा भुमन्नावार हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. घरातील कपाटाची चावी वापरून तिने सोन्याचे दागिने चोरून आपल्या प्रियकर रवी सिद्धाप्पा मेलगुडे (रा. बेळगाव, कर्नाटक) याच्याकडे दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी पुढील तपास करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी दागिने फायनान्स कंपनीत तारण ठेवून पैसे काढल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी ३२ ग्रॅम मंगळसूत्र, अंगठी, सोन्याची चैन, नथ व इतर दागिने असा एकूण ७.२२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पो. हे. कॉ. सचिन देसाई करत आहेत.