वैचारिक प्रदूषण वाढल्याने भावी पिढीसाठी प्रबोधनाची गरज : आ.सतेज पाटील

<p>वैचारिक प्रदूषण वाढल्याने भावी पिढीसाठी प्रबोधनाची गरज : आ.सतेज पाटील</p>

कोल्हापूर – सध्या देशात वैचारिक प्रदूषण वाढले आहे. अशा काळात येणाऱ्या पिढीला प्रबोधनाच्या माध्यमातून सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त फुले, शाहू, आंबेडकर विचार संस्थेच्यावतीने नवीन वाशी नाका येथे स्वर्गीय आनंदराव दिंडोर्ले सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

 यावेळी महाडच्या चवदार तळ्यातून आणलेले पाणी पिंपळाला घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला संस्थापक अध्यक्ष एस एस कांबळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीपणाने राज्यघटना लिहिल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकरांसारखे कर्तृत्वान नेतृत्व लाभले म्हणूनच देशाचा पाया मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनसाठी जमीन दान केल्याबद्दल उद्योजक शिवराज पाटील तसेच कोल्हापूर महानगरपालिकेत अनुसूचित जाती जमातीतील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत निरंजन टकले यांनी भारतीय संविधान आणि सद्यस्थिती याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर भीमगीतांचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, नगरसेविका जयश्री कांबळे, नगरसेविका अरुणा गवळी, बबन रानगे, एस वाय कामत, डी जी भास्कर, बी के साबळे, शुभांगी कांबळे, के डी कांबळे, प्राध्यापक रवींद्र खैरे, पांडुरंग कांबळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद, बौद्ध बांधव उपस्थित होते.