मंगळवारी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर...
कोल्हापूर - राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे २१ एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते कोल्हापूर पोलीस मुख्यालय, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि गडहिंग्लज पोलीस उपअधीक्षक कार्यालयाची तपासणी करणार आहेत.
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या दौऱ्यात प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत क्राईम आढावा बैठक आणि विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता हे त्यांचे स्वागत करतील. यानंतर ते पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देतील. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याची तपासणी होणार आहे. बुधवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर परेड आणि अलंकार हॉल येथे पोलीस संमेलन होणार आहे तर बुधवारी सकाळी १० वाजता पोलीस मैदानावर दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिके सादर होणार आहे. दुपारी मोटार परिवहन विभाग, बॉम्ब शोध आणि नाशक कार्यालयाची तपासणी होणार आहे. त्यानंतर पोलीस मुख्यालयामध्ये क्राईम आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी ते विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतील. या तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचा आढावा ते घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस दलात तयारीची लगबग सुरू आहे.