शिवाजी विद्यापीठाच्या 'सैफ' केंद्राचा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरव
कोल्हापूर - केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या एक्स, लिंक्डइन आणि फेसबुक या समाजमाध्यमांच्या मंचांवरून शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी म्हणजेच सैफ केंद्राची माहिती देणारी तीन मिनिटांची लघुचित्रफीत प्रदर्शित केली आहे. सीएफसी सैफ म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज विभाग होय. शिवाजी विद्यापीठातील हे केंद्र संपूर्ण भारतातील संशोधक, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना अत्याधुनिक विश्लेषणात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा पुरवत आहे. मंत्रालयाच्या सैफ कार्यक्रमांतर्गत २०१४ मध्ये स्थापन झालेले हे केंद्र, अतिप्रगत उपकरणांच्या सहाय्याने अचूक विश्लेषण आणि नाविन्यपूर्णतेला चालना देऊन वैज्ञानिक संशोधनाला यशस्वीपणे बळकटी देत आहेत.
या पोस्टमध्ये मंत्रालयाने खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, सचिव अभय करंदीकर यांच्यासह केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, सीएसआयआर-इंडिया यांना टंग केले आहे. विद्यापीठातील या केंद्राचे संचालक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी मंत्रालयाकडून झालेल्या गौरवाबद्दल समाधान व्यक्त केले.
या पुढील काळातही या ठिकाणच्या उपकरणांची संख्या वाढविण्यात येऊन आणखी दर्जेदार आणि आधुनिक विश्लेषण सुविधा संशोधकांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच हा सन्मान केंद्राला लाभलाय, अशी भावना डॉ यादव यांनी व्यक्त केली आहे.