चंदूरमध्ये दोन गटात दगडफेक...२५ ते ३० जणांवर गुन्हा
कोल्हापूर - चंदूर येथील सिद्धार्थनगर परिसरात शनिवारी शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक सुरू होती. यावेळी दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, त्यावेळी जमावातील काही जणांनी अचानक दगडफेक सुरू केली.
या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. तसेच पोलिस कॉन्स्टेबल पवन गुरव आणि प्रमोद चव्हाण हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद वायदंडे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र वातावरण तणावपूर्ण बनल्याने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी प्रतिक कांबळे, समीर कांबळे, रोहीत राजू कांबळे, लक्ष्मी राजू कांबळे, विशाल माने, महेश पाटील, प्रेम महादेव भोसले, अजित रामदास पवार, राहूल उर्फ रामदास माने, ओंकार बसवराज कल्याणी यांच्यासह २५ ते ३० जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद वायदंडे करत आहेत.