सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातले आंदोलन अधिक तीव्र

<p>सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातले आंदोलन अधिक तीव्र</p>

कोल्हापूर - राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ काढावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, चतुर्थश्रेणी आणि वाहनचालक भरतीवरील बंदी उठवावी, यासह प्रमुख मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने सुरू असलेला बेमुदत संप आज दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. गेल्या १५ महिन्यांत सात वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिला नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. तसेच विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या मागण्यांकडेही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. २१ एप्रिलपासून सुरू झालेल्या या संपात राज्यभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातही आंदोलन तीव्र होताना दिसते आहे. आज मोठ्या संख्येने कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यानात एकत्र आले. त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

येत्या १ मेपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास परीक्षा, निवडणुका, जनगणना यासह विविध शासकीय कामांवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिला आहे.

या आंदोलनात संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, तुषार पाटील, संजीवनी दळवी, नारायण पाटील, के. एच. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनाला विविध संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, शेकापचे प्राचार्य टी. एस. पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, कॉम्रेड दिलीप पवार, बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक, राज्य परिवहन महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे रवी जाधव, माध्यमिक शिक्षक संघ टीडीएफचे राजेश वरक, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विवेकानंद गोडसे यांनी पाठिंबा दर्शवला.

या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, विनायक लुगडे, डॉ. प्रविण कोडोलीकर, अनिल कांबळे, सुदाम पाटील, सुप्रिया पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी सहभागी झाले होते.