शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधन
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला असून विद्यापीठातून हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे लेखांकन, वित्त आणि उद्योजकता या विषयांवर चांगले प्रभुत्व होतं. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता काम केले आहे. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन, विकास केंद्राचे संचालक आणि सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.अनेक समाजाभिमुख उपक्रम त्यांनी या केंद्रांच्या माध्यमातून राबविले आहेत. विद्यापीठासमवेत विविध आघाडीच्या आस्थापनांचे सामंजस्य करार घडवून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
निर्गुंतवणूक, वित्त व व्यवस्थापन, आर्थिक समावेशन इत्यादी विविध वाणिज्यिक संशोधनपर विषयांवर विविध परिषदांत दीडशेहून अधिक शोधनिबंध त्यांनी सादर केले आहेत. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठाची मोठी हानी झाल्याची भावना प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली आहे.