मदरशांना अनुदान देण्याचा निर्णय स्थगित करावा : हिंदू जनजागृती समितीची मागणी
इचलकरंजी - राज्य सरकारने डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील ३०८ मदरशांना प्रत्येकी ५० लाखांचे अनुदान देण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, शासनाचा निधी सर्वसमावेशक असावा, सर्व मदरशांचे सर्वेक्षण करावे, सर्व धार्मिक शिक्षण संस्थांना समान न्यायाने निधी द्यावा आणि अभ्यासक्रमावर देखरेख ठेवावी, यासह अन्य मागण्या हिंदू जनजागृती समितीच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
यावेळी मागण्यांचे निवेदन इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले आहे. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे. यावेळी संजय घाडगे, पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हात्तीकर, दत्ता पाटील, कपिल सुतार, राजू हाणभर, मनोहर म्हेत्रे, आनंदा मकोटे, आनंदा भोकरे, तेजस राणे, सचिन कुरुंदवाडे, अनिकेत तानुगडे आदि उपस्थित होते.