इचलकरंजीत दुसऱ्या दिवशी एएससी कॉलेज परिसरातील अतिक्रमणावर कारवाई...
पुन्हा अतिक्रमण कराल तर गुन्हा दाखल करू : आयुक्त पल्लवी पाटील
इचलकरंजी – शहरात कालपासून महानगरपालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरवात करण्यात आली आहे. आज या मोहिमेअंतर्गत शहरातील एएससी कॉलेज परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या पथकाने रस्त्यालगत उभारण्यात आलेले तात्पुरते शेड, हातगाड्या, फलक, अनधिकृत बांधकाम साहित्य आणि फुटपाथ अडवून ठेवलेले साहित्य हटविले. या कारवाईमुळे परिसरातील रस्ता मोकळा झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे या कारवाईवेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील या स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून होत्या. त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि वेळकाढूपणा करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कामात कसूर खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी, अतिक्रमणधारकांनाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला आह्ये. हटविण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा केल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सुनावले. यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील अनेक प्रमुख मार्ग आता मोकळे होत असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. पुढील काही दिवसांत शहरातील इतर भागांमध्येही अशीच मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.