काँग्रेसच्या संघटन, सृजन आणि अभियानाला कोल्हापुरातून सुरुवात
बिनबुडाचे आरोप करुन गोकुळला बदनाम करु नका : आ. सतेज पाटील
कोल्हापूर - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून देशभरात संघटन, सृजन आणि अभियान ही विशेष मोहीम राबवण्यात येतीय. काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात १३ ते १८ एप्रिल दरम्यान हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती आज काँग्रेस जिल्हा कमिटीमध्ये पत्रकार बैठकीत देण्यात आली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रतिभा धानोरकर, सचिन सावंत, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटी मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून देशभरात संघटन, सृजन आणि अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधी निवडले जाणार असून, राज्यभरातून सुमारे साडेसात हजार नवीन नेतृत्व तयार करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सर्व जाती-धर्मातील लोकांचा सहभाग आणि महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे, असे केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील यांनी, काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हे अभियान राबवत असल्याचे सांगितले. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या १५ एप्रिल रोजी आजरा येथे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. साताऱ्यातील घटनेचा उल्लेख करत त्यांनी दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांना पोलिसांकडून घेऊन जाण्याची घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. मतदार यादीतून नागरिकांची नावे कमी होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
याबाबत माहिती घेऊन नागरिकांशी संपर्क साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही वाचवण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी, आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळवर केलेल्या आरोपावर उत्तर देताना आमदार पाटील यांनी गोकुळ ही संस्था पूर्णपणे पक्षविरहित पद्धतीने चालवली जात असल्याचे सांगितले. आम्ही गोकुळमध्ये राजकारण न आणता शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करतोय. गोकुळला महायुतीची झालर कोणी दिली, हे सगळ्यांना माहिती आहे. आमचा स्पष्ट हेतू संस्थेची प्रतिमा स्वच्छ ठेवणं आणि ती अधिक सक्षम करणं हा आहे त्यामुळे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून संस्थेला बदनाम करू नये. असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बदल गरजेचे असून सर्व कार्यकर्त्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केले आहे. सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यालाही न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. भ्रष्टाचारी झालेले नेते भाजपमध्ये घेतले जातायत. गेल्या बारा वर्षापासून ईडी, सीबीआयचा वापरून एकाधिकारशाही निर्माण करण्याचे काम केकेले आहे. पुन्हा रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही संघटन मजबूत करतोय, असे सचिन सावंत यांनी सांगितले.
यावेळी सुनील माणके, राहल गायकवाड, राहुल वर्धा, नंदकुमार कुंभार, कुंदाताई जेणेकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्ष नेता राजेश लाटकर, नगरसेवक राहल माने, इंद्रजीत बोंद्रे, प्रवीण केसरकर, सचिन शेंडे आदी उपस्थित होते.